मोहिमेतील पहिलाच किल्ला असल्याने दुसऱ्या दिवशी आपण थकून जाणार
याची कल्पना होती. त्यामुळे जोडून २ दिवस सुट्टी मिळेल अशा दिवशी जायचं ठरलं आणि २६ व २७ जानेवारी असा मुहूर्त
निघाला. माझ्या सोबत ऑफिसमधले निखिल, अजित, राहुल, गौरव हे सगळे येणार होते. २६ ला सकाळी ७ वाजता सगळ्यांनी
मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नसरापूर फाट्यावर भेटायचे असे ठरले.
त्यादिवशी सकाळी जरा जास्तच थंडी होती. त्यामुळे सगळं काही एकदम
झाकून पाकून मी सकाळी ६.१५ ला माझ्या गावावरून निघालो. बाकीचे सगळे जण पुण्यावरून येणार होते. नियोजनातील
पहिलाच गड आज सर करायची उत्सुकता प्रचंड असल्याने मी गाडी अगदी सुसाट चालवत होतो. वेळेत पोहोचायचे देखील होते.
तरीही ठरल्याप्रमाणे पोहोचायला मला २० मिनिटे उशीर झालाच. सगळे पोहोचले होते. अजित आणि निखिल सोबत त्यांचे
पुण्यातले दोन मित्रही आले होते. म्हणजे आम्ही एकूण ७ जण झालो होतो. फोटो काढण्यासाठी मी माझा DSLR आणलेला
पाहून सगळेजण एकदम खुश झाले. सगळ्यांची गळाभेट करून आम्ही तोरण्याच्या दिशेने निघालो. सगळ्यांचा उत्साह पाहून
"वेडात मराठे वीर दौडले सात" असाच अनुभव क्षणभर आला. सगळे माझ्या अगोदर आल्याने त्यांचा चहा पाणी झाला होता,
मी मात्र उशिरा आल्याने मला चहा न घेताच तसंच थंडीनं कुडकुडत पुढे निघावं लागलं.
आता आम्हाला सर्वात पहिले वेल्हे गावात पोहोचायचं होत. जे गडाच्या
पायथ्याला आहे. वेल्हे गाव तालुक्याचं ठिकाण असल्यानं तिकडे जाणारा रस्ता चांगला आहे. रस्त्याने जाताना डाव्या
हाताला कानंद नदीचं खोर दिसतं. त्याच्यापलीकडे नसरापूर पासून सुरु झालेली एक डोंगररांग अगदी तोरणा गडापर्यंत
एकसलग जाऊन पोहोचते. पाच दहा किलोमीटर दुरूनच नजरेला तोरणा गड दिसू लागतो. आणि तो एकदा दिसायला लागला कि कधी
एकदा तिथे पोहोचू असे होते.
साधारण ८ वाजताच्या दरम्यान आम्ही वेल्हे गावात पोहोचलो. कुणीच काही खाऊन आलेलं नसल्याने थोडस खाऊन मग गड
चढायला सुरुवात करायची असे ठरले. सगळ्यांनी भक्कम नाष्टा केला आणि आम्ही पुढे निघालो. गडाचा पहिला टप्पा
गाडीवरच पूर्ण होतो. गावातून पार्किंग पर्यंतचा रस्ता सुरुवातीला थोडासा सोडला तर सगळा सिमेंटचाच आहे. पण
एकावेळी एकच गाडी जाऊ शकेल एव्हढा अरुंद, त्यामुळे चारचाकी घेऊन जाणार असाल तर काळजी घ्या. पार्किंगला गाड्या
लावून सगळ्यांनी थोडा वेळ फोटोसेशन केलं आणि आम्ही गडाकडे वळलो. समोर गड पाहिला तो तिथूनच एव्हढा मोठ्ठा दिसला
आणि छातीत धस्सच झालं. काही क्षण डोळे मिटले आणि जरा इतिहासात डोकावलं. आणि शिवाजी नावाचं एव्हढस लेकरू
वयाच्या १६ व्या वर्षी हा गड चढतंय असं चित्रच समोर उभं राहील आणि ऊर्जेची एकलहर अंगभर चमकून गेली. आणि सुरु
झाला तोरणाच्या चढणीचा प्रवास.
वेल्हे गावापासून किल्यावर जाईपर्यंत चढणीचे तीन टप्पे पडतात पहिला गावापासून पार्किंग पर्यंतचा जो आम्ही
गाडीवरच पूर्ण केला. दुसरा पार्किंग पासून कठीण चढणीपर्यंतचा, आणि तिसरा कठीण चढणीपासून वर गडावर
पोहोचेपर्यंतचा. ९ वाजून गेले होते तरी थंडी अजूनही जाणवत होती. तिचा फायदाही होत होता कारण चालून कुणी
म्हणावं तेव्हढं दमत न्हवतं. दुसरा टप्पा चढून जायला साधारण अर्धा तास लागला. तिथून कानंद नदीचं खोर आणि नदीवर
असलेल्या गुंजवणी धरणाच्या पाणीसाठ्याचं दृश्य अगदी विलोभनीय असं दिसत. जरा वेळ तिथे विश्रांती घेऊन फोटो
वगैरे काढून आम्ही पुढे निघालो.
आता आमचे खरे कसब पणाला लागणार होते कारण आता खरा चढणीचा अवघड प्रवास आम्ही करणार होतो. अगदी हा टप्पा सुरु
झाल्यापासून कधी डावीकडे तर कधी उजवीकडे आधारासाठी रेलिंग असल्याने चालताना विशेष कसरत करावी लागत
न्हवती.
मधेच पाणी पिण्यासाठी काही क्षण थांबून आम्ही आमची वाटचाल चालूच ठेवली. जसजसे आम्ही वर चढू लागलो तसतसे
किल्ल्याला लाभलेल्या कातळ कड्याची भव्यता जाणवू लागली. आता बिनीचा दरवाजा नजरेच्या टप्प्यात आला. जराशी सपाट
पायवाट चालून संपली कि या दरवाज्यापाशी पोहोचण्यासाठी परत एकदा कंबर कसावीच लागते. तिथेच एका खडकावर काही
माकडांची पिल्ले अगदी सहजतेने उभ्या खडकावर वर-खाली करतायेत हे पाहून मला त्यांचं भलतंच कौतुक वाटलं. मग बाकी
एका दमात हि चढण चढून जायचं असा मी निर्धारच केला आणि एका हातात कॅमेरा पकडून मी झप-झप एका दमात ती चढण चढून
पहिल्या दरवाजात येऊन पोहोचलो.
तसा आकारमानाने हा दरवाजा लहान आहे. पहारेकऱयांसाठीच्या देवड्या,
लाकडी दरवाजा लावण्यासाठीच्या दगडी खोबण्या, दगडी महिरपी कमान अशी एकंदरीत दरवाजाची रचना होती. दरवाजाच्या वर
जाण्यासाठी डाव्या बाजूने पायऱ्यादेखील आहेत. पण त्या मार्गावर माकडे जास्त असल्याने मी काही तिकडे जाण्याचं
धारिष्ट्य केलं नाही कारण, एका जोडप्याच्या हातातील पाण्याची बाटली काहीतरी खायला मिळेल ह्या आशेने माकडाने
पळवून नेलेली मी पाहिली होती. त्यामुळं या ठिकाणी तुम्ही जाल तेव्हा जरा जपूनच. आता इथून पुढे कमी जास्त
उंचीच्या पायऱ्या होत्या. त्यामुळं आपसूकच कसरत कमी होणार होती. बिनीच्या दरवाजातूनच वर पाहिल्यास गडाच्या
मुख्य कोठी दरवाजाचे दर्शन होते.
पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर म्हणजे तोरणागड म्हणजेच प्रचंडगड. हा किल्ला जिंकून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले असं म्हणतात, म्हणून १२ महिने २४ किल्ले या मोहिमेला पहिले तोरण याच किल्ल्याचे. पुण्यापासून साधारण ६० किमी अंतरावर वेल्हे तालुक्यात असलेला हा किल्ला.
पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या परिसरात असे काही किल्ले आहेत. ज्यांची नावे देखील आपणास माहीत नाहीत. परंतु या किल्ल्यांवर इतिहासात पराक्रमाच्या गाथा लिहिल्या गेलेल्या आहेत. भोर पासनू अगदी हाकेच्या अतंरावर असलेला, परंतु आजही सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील रायरेश्वराशेजारी भग्न अवथेत शांतपणे उभा असलेला ...
सह्याद्रीच्या डोंगररांगेतल्या रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहिडेश्वर’. रोहीडखोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसलेले आहे. रोहिडेश्वर किल्ला हे रोहीड खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते. रोहिडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे ६ मैलांवर आहे. रोहिडेश्वर किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे ...
रायरेश्वर हे सह्याद्री डोंगररांगामधील एक ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळ आहे. या पठारा वरील रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर प्राचीन आहे. हिंदवी स्वराज स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ ला येथेच हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यामुळे...
महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून मल्हारगड किल्ला प्रसिद्ध आहे. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला ‘सोनोरी’ म्हणूनही ओळखले तसेच याचं बांधकाम मराठेशाही च्या शेवटच्या म्हणजे आताच्या अगदी अलीकडच्या ...
पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण ६० कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० फूट उंच आहे. समोरच ३-४ कि.मी अंतरावर तुंग किल्ला दिसतो. किल्ल्याच्या त्रिकोनी आकारामुळे याला "तिकोना" असे नाव पडले आहे . तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. परंतु ...